लोणावळा : येथील आंतरराष्ट्रीय योग संस्था कैवल्यधाम यांच्या वतीनं लोणावळा शहर आणि परिसरात 21 जुन आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला. यात प्रामुख्याने लोणावळा शहर तसेच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यासाविषयी जनजागृती व्हावी यासाठी योग वर्गाच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. विशेष म्हणजे यासाठी वेगवेगळ्या वाड्या वस्त्या, शाळा आणि ऐतिहासिक स्थळी हे वर्ग घेण्यात आले.
तुंगार्ली तलावाच्या जवळील धनगर व आदिवासी वस्ती, सहारा सिटी जवळील कोराईगड, भाजे लेणी, कार्ला लेणी आणि खुद्द कैवल्यधाम योग संस्थेत योग गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मोफत योग वर्ग घेण्यात आले. या सर्व योग शिबिरांमध्ये नागरिकांनी सहभागी होत, योगाचे धडे घ्यावेत असे आवाहन कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांच्या वतीनं करण्यात आले होते.
लोणावळा शहरातील पोलीस व पत्रकार यांच्यासाठी योग संस्थेत एक तासाचे विशेष सत्र घेण्यात आले. योगगुरु निरज सिंग यांनी या सर्वांना योगाचे प्रशिक्षण देत असताना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.