लोणावळा : काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या पारंपरिक खेळांना उजाळा मिळावा आणि नव्या पिढीला आपल्या या खेळांची माहिती व्हावी यासाठी तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक मंगळागौर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिवाय यावेळी तुंगार्ली प्रभागात काम करणाऱ्या नगरपरिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
उपक्रमशील मंडळ म्हणून ख्याती असलेल्या ओमकार तरुण मंडळाच्या महिला विंगेच्या वतीने दरवर्षी महिला तसेच मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत. यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर खेळात तरुण महिलांसोबत जेष्ठ महिलांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती लावत स्वतः गाणी गात फेर धरला होता. फुगडी, कोंबडा, सुप, घागर, झिम्मा आदी खेळ खेळत महिलांनी धमाल उडवून दिली होती. मंडळाच्या महिला विंगेच्या अध्यक्षा प्रतीक्षा खिल्लारे, उपाध्यक्ष ज्योती येवले, सचिव पूजा गोसावी, यांच्यासह सर्व महिला सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
तुंगार्ली प्रभागात स्वच्छतेचे काम करणारे लोणावळा नगरपरिषद स्वच्छता विभागाचे मुकादम यशवंत वाघमारे, स्वच्छताकर्मी राघू भालेराव, लियाकत शेख, मोहन रिले, संगीता वालेकर, लता रिले, लीला रिले, आनंद वाघ आणि रियान शेख यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या दरम्यान लोणावळ्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील, उपमुख्याधिकारी भगवान खाडे, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाच्या हळदीकुंकू समारंभात 700 महिलांचा सहभाग
मंडळाच्या वतीनं महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभात 700 महिलांचा सहभाग घेतला. या सर्व महिलांना मंडळाच्या महिला सदस्यांकडून हळदीकुंकू आणि वाण स्वरूपात गॅस लायटर भेट देण्यात आली.
सातत्याने रक्तदान करणाऱ्या सदस्यांचा ओमकार मंडळाच्या वतीनं विशेष सत्कार
आजारी किंवा अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त मिळाले तर त्या रुग्णांचा जीव वाचत असतो. त्यामुळे रक्तदान हे महादान समजलं जातं. ओमकार मंडळाच्या वतीनं सातत्याने रक्तदान शिबिर घेतले जातात किंवा अनेकदा इतर कुठे रक्तदान शिबीर असेल तर कार्यकर्त्यांना त्याठिकाणी पाठवलं जात. मंडळाचे सदस्य सतिष गावडे यांनी आतापर्यंत 49 वेळा, नितीन गायकवाड यांनी 30 वेळा, किरण येवले यांनी 29 वेळा तर रमेश शर्मा यांनी 26 वेळा रक्तदान केलं आहे. या सर्वांचा यावेळी मंडळाच्या वतीने आणि विजय इंगळे यांच्या सहकार्यातुन विशेष सन्मान करण्यात आला.