लोणावळा : #heritagewalk #sampark सह्याद्रीच्या डोंगर रांगात ताठ मानेने उभ्या असलेल्या आणि हजारो वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा अर्थात वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा यासाठी मागील पाच वर्षांपासून संपर्क ही संस्था प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि मराठ्यांच्या तसेच या महाराष्ट्र भूमीच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लोहगड किल्ला आणि भाजे लेणीची सफर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून घडवून आणण्याचा संपर्क संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीनं रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी संपर्क हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव अमितकुमार बॅनर्जी यांनी दिली.
मावळ तालुक्यात लोहगड आणि भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या भाजे गावात संपर्क संस्था ही अनाथ व निराधार बालकांसाठी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेची स्थापना १९९० मध्ये अनाथ, निराधार, दुर्लक्षित व लाल बत्ती परिसरात काम करणाऱ्या महिलांच्या मुलांचे शिक्षण, संगोपन आणि भविष्य निर्धारण करण्याचा उद्देश समोर ठेवून झाली. सोबतच ग्रामीण भागातील तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, कौशल्य विकास, औद्योगिक प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, ग्रामीण भागासाठी रुग्णालय असे विविधांगी कार्य संपर्क संस्था सातत्याने करीत आहे. हे कार्य करीत असताना मावळ तालुक्यातील प्राचीन वास्तूंना गेल्या ५ वर्षापासून प्रकाश झोतात आणण्याचे काम देखिल सातत्याने संपर्क कडून सुरू आहे. यासाठी दरवर्षी संस्थेकडून संपर्क हेरीटेज वॉकचे आयोजन केले जाते. मात्र गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सर्वांनाच जखडून ठेवले होते. दरम्यानच्या काळात संपर्क हेरीटेज वॉक च्या यात्रेत खंड पडला, परंतु यंदाच्या वर्षी पुन्हा नव्या जोमाने या हेरिटेज वॉक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील किंबहुना मुंबई पुणे येथील अनेक लोकांना भाजे लेणी, बेडसे लेणी, लोहगड, विसापूर या वास्तूंची माहिती नाहीये. नेमका हाच मुद्दा समोर ठेवून लोकांना आपल्या संस्कृतीची, प्राचीन वास्तूंची व अनुषंगाने आपल्या इतिहासाची माहिती लोकांना व्हावी याकरिता समविचारी लोकांना एकत्र आणत संपर्क संस्थेने 5 वर्षांपूर्वी ‘संपर्क हेरीटेज वॉक’ ही चळवळ सुरु केली आणि हजारो इतिहास प्रेमी, पर्यटक यात सहभागी झाले. यावर्षी देखील या वॉक मध्ये 6 ते 8 हजार लोकं यात सहभागी होतील अशी अपेक्षा बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
या प्राचीन अनमोल वास्तूंचे संरक्षण करतांना या परिसराला जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बनवून स्थानिक लोकांच्या जीवनात सुरक्षितता निर्माण करण्यासाठी संपर्क संस्था प्रयत्नशील असल्याचे बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत संगितले. सोबतच त्यांनी या ‘संपर्क हेरीटेज वॉक’ची उद्दिष्टे देखील स्पष्ट केली. ती पुढीलप्रमाणे आहेत
- प्राचीन वास्तूंचे रक्षण, त्यांची स्वच्छता आणि त्यांचे महत्व लोकांना पटवून देणे
- संस्कृती आणि इतिहासाची आठवण लोकांमध्ये नेहमी जागृत रहावी यासाठी प्रयत्न करणे
- देशी तसेच विदेशी पर्यटकांचे लक्ष या प्राचीन वास्तूंकडे वेधून पर्यटन विकास करणे
- भाजे-कार्ला-बेडसे लेणी, लोहगड-विसापूर किल्ला यांची युनेस्को मध्ये नोंद व्हावी याकरिता स्थानिक लोकांना प्रेरित करणे
- परिसरातील दुर्लक्षित, आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांना संरक्षण देणे तसेच त्यांना मदत करणे या करिता लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे
- स्थानिक लोकांना रोजगार निर्मितीचे, उपजीविकेचे साधन निर्माण करून देणे
18 डिसेंबर 2022 ला संपन्न होणाऱ्या ‘संपर्क हेरीटेज वॉक’ मध्ये सहभागी होणाऱ्यांना पिठलं भाकरी ठेचा, वडा पाव, मक्याचे कणीस अशा अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांची चव देखील चाखता येणार आहे. ३८०० फुट उंचीवर असलेल्या लोहगड किल्याच्या पायथ्याला देखणा सांस्कृतिक सोहळा पाहता येईल. सहभागी होणाऱ्यांचे आदिवासी महिला तसेच मुले यांच्याकडून स्वागत केले जाईल. वॉक च्या मध्ये मदतीकरिता आपल्याला जागोजागी स्वयंसेवक तत्पर असतील. ते आपल्याला पिण्याचे पाणी, कोल्ड ड्रिंक, खाद्य पदार्थ पुरवतील. सोबतच वैद्यकीय कर्मचारी देखील आपल्या मदतीला असतील. या ३.५ कि.मी. च्या वॉक मध्ये १६ प्रकारच्या महाराष्ट्रीयन लोककलांचा आनंद घेता येणार आहे.
संपर्क संस्थेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जास्तीत जास्त संख्येने या वॉक मध्ये सहभागी व्हावे, नोंदणीसाठी संस्थेच्या www.samparcheritagewalk.com या वेबसाईटवर भेट द्यावी.