लोणावळा : लोणावळा शहरात भरमसाठ वाढत चाललेले आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे ऑटो रिक्षा स्टँड, या ऑटो रिक्षा चालकांद्वारे प्रवाशांकडून आकारले जाणारे मनमानी रिक्षा भाडे यावर नियंत्रण आणण्यासाठी आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल असं लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले. ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
लोणावळा नगरपरिषद कार्यालयात झालेल्या बैठकीला आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्यासह लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील, पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे यांच्यासह विविध रिक्षा संघटनेचे, रिक्षा स्टँडचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीलाच रिक्षा चालकांनी त्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी सांगीतल्या. यात प्रामुख्याने वाढणाऱ्या रिक्षांची संख्या, स्टँडसाठी कमी पडणाऱ्या जागा, जुन्या स्टँडधारकांकडून नवीन रिक्षा चालकांना मिळणारी सापत्न वागणूक, रिक्षा व्यवसायावर खाजगी चारचाकी वाहनचालकांकडून होत असलेले अतिक्रमण, शहरात विनापरवाना आणि कालबाह्य झालेल्या खाजगी रिक्षा तसेच सहा आसनी रिक्षांचा सुळसुळाट, पावसाळी पर्यटन काळात विकेंडला भुशी धरणाकडे जाताना आणि त्याठिकाणी रिक्षा पार्किंग करताना येणाऱ्या अडचणी यांचा समावेश होता.
यासर्व प्रश्नांवर उत्तर देताना आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी शहरातील सर्व अधिकृत, अनधिकृत रिक्षा स्टँडची माहिती घेऊन त्यांचं योग्य जागी नियोजन करण्याचे, तसेच अधिकृत रिक्षा स्टँडशिवाय इतरत्र उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या सोबतच स्थानिक नागरिकांकडूनही येथील रिक्षा चालक मनमानी भाडे घेतलं जातं असल्याची अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत असल्याने ठिकाणवार भाडे निच्छिती करून तसे फलक रिक्षास्टॅण्ड जवळ ठळकपणे दिसतील आशा प्रकारे लावण्याचे आणि वरील दोन्ही विषयावर प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत बैठक घेऊन त्यांच्या संमतीने निर्णय घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले. सोबतच अनधिकृत प्रवासीवाहतूक करणाऱ्या टॅक्सी तसेच सहा आसनी रिक्षांवर संयुक्त कारवाई केली जाणार असल्याचेही सांगितले.
नगरपरिषदेच्या सहकार्याने शहारत अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
लोणावळा नगरपरिषदेच्या सहकार्याने शहरातील भांगरवाडी ते राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुंबई मसाला हॉटेल पर्यंतच्या मार्गावर असलेल्या विविध चौकांमध्ये 29 ठिकाणी अद्यावत आणि स्पीकर सिस्टीमसह सज्ज असे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कुमार चौकासह तीन ठिकाणी सिग्नल सिस्टीम बसवली जाणार असून त्याद्वारे वाहतूक नियंत्रण केले जाणार असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.