लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने सलग सहाव्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत संपूर्ण देशभरातील शहरांना मागे सारून पुरस्काराचा षटकार मारत दिल्लीत आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. मागील वर्षी देशात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर राहण्याचा मिळवलेला मान कायम ठेवत लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा कमी जनसंख्या असलेल्या शहरांच्या गटात देशात तृतीय क्रमांक प्राप्त करीत राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित होण्याचा बहुमान प्राप्त केला.
पारितोषिक वितरण समारंभ व्हिडीओ
आज गुरुवारी 11 जानेवारी रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात लोणावळ्याचे तत्कालीन मुख्याधिकारी पंडित पाटील, विद्यमान मुख्याधिकारी अशोक साबळे, शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते व केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय नगरविकास राज्य मंत्री कौशल किशोर यांच्या उपस्थितीत पारितोषिक स्वीकारले. याशिवाय लोणावळा शहराने वॉटरप्लस आणि कचरामुक्त शहर म्हणून थ्री स्टार मानांकन देखील प्राप्त केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा कमी जनसंख्या असलेल्या शहरांच्या गटात महाराष्ट्रातील सासवड या शहराने प्रथम तर छत्तीसगड राज्यातील पाटण या शहराने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा सुरू झाल्यापासून लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्ष श्रीमती सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सर्व आरोग्य सभापती, सर्व नगरसेवक तसेच त्या त्या वेळचे प्रत्येक मुख्याधिकारी आणि नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी अवरीत प्रयत्न आणि कष्ट करीत लोणावळेकर नागरिकांच्या सहकार्याने लोणावळा शहराला प्रत्येक वर्षी पहिल्या पाच क्रमांकात कायम ठेवत देश पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
लोणावळा नगरपरिषद ही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कायमच अग्रेसर राहिली आहे. यात सर्व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी, सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार संघ, सामाजिक संस्था, शाळा व नागरिक यांच्यामुळेच हे यश असे अबाधित राहिले असल्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील आणि अशोक साबळे यांनी सांगितले. तसेच यापुढेही स्वच्छ सर्वेक्षणात सातत्यपूर्ण कामगिरी राखण्याचा तसेच लोणावळा शहराला स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याचा मानस व्यक्त केला.
#swachhsurvekshan2023
#swachhabharatmission
#swachhatechashatkar
#swachhlonavala
#SwachhtaKaTaj
#presidentaward