लोणावळा : येथील ओंकार तरुण मंडळ, तुंगार्ली यांच्या वतीनं आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने उकसान, ता. मावळ याठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तगट तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 261 महिला आणि पुरुषांची जनरल तपासणी करून त्यांना औषध देण्यात आली. शिवाय 173 नेत्र तपासणी करीत त्यातील 103 जणांना मोफत चष्मे वाटण्यात आले तर 20 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुचवण्यात आली. 67 जणांचे हिमोग्लोबिन, रक्तगट देखील यावेळी तपासण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामीण परिसरातील बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन उकसान जिल्हा परिषद शाळा येथे मंडळाचे अध्यक्ष संजय उतेकर, सरपंच आशा विलास बांदल, उपसरपंच अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. सतीश वाघ, डॉ. देविदास गर्जे आणि डॉ. अर्चना अगरवाल यांनी आपली सेवा या आरोग्य शिबिरासाठी दिली. यावेळी मंडळाचे मानद अध्यक्ष राजू बच्चे, सतीश गावडे, प्रसाद मावकर, पंढरीनाथ वाडेकर, रघुनाथ मावकर, प्रमोद खिल्लारे, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर मावकर, सुजित बलकवडे, गणेश शेलार, दादाराव शेरेकर, विनोद शेलार, विकास पाटील, शिवाजी शिंदे, मयूर बोरकर, रमेश शर्मा, ग्रा.पं.सदस्य शामल इंगवले, आशा मोरमारे, सीताबाई शिंदे, निशा कोंढरे, सारिका कोंढरे, ग्रामसेविका अश्विनी झेंडे, पोलीस पाटील सुषमा शिंदे तसेच मंडळाचे असंख्य सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते.
आरोग्य शिबिराच्या दरम्यान मंडळाच्या वतीने येथील 25 आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. शिवाय 125 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ आणि प्रथमोपचार साहित्याचे वाटप करण्यात आले. 100 महिलांना यावेळी सॅनिटरी पॅड देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आले. ओंकार तरुण मंडळ, तुंगार्ली यांच्यावतीनं दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या ग्रामीण, आदिवासी गावात जाऊन त्याठिकाणी आशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते.