खोपोली : क्रिकेट खेळला म्हणून कप्तान पदावरून काढण्यात आले असा अजब प्रकार रायगड जिल्ह्यात घडला असून याबाबत सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या खेळाडूचा दोष तरी काय? क्रिकेटपटूने खेळ खेळला म्हणून कप्तान पदावरून दूर करणे याबाबत उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्हा क्रिकेट असोशियनचा वरिष्ठ खेळाडूचा संघ पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आमंत्रित साखळी स्पर्धेचे सामने सध्या खेळत आहे, त्या संघाचे नेतृत्व खोपोलीचा खेळाडू निकुंज विठलाणी करीत आहे. निकुंज 17 व 18 फेब्रुवारी 2019 यादरम्यान खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय सामन्यात खेळण्यास खोपोली येथे आला असता त्यावर रायगड क्रिकेट असोसिएशनने शिस्तभंगाची कारवाई म्हणून कर्णधार पदावरून तात्काळ काढून टाकण्यात येत असल्याचे दूरध्वनीवरून कळवले. या नियमबाह्य कारवाई विरोधात खोपोली क्रिकेट असोशियनचे अध्यक्ष यशवंत साबळे व सचिव अविनाश तावडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी आश्चर्य व्यक्त करीत नाराजी प्रकट केली आहे. रायगड जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष हे रजेवर असताना ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आल्याने सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे. जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष हे प्रारंभी पासून खोपोली क्रिकेट असोशियन चे प्रतिनिधी म्हणून रायगड जिल्हा कार्यकारिणीवर कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून या कारवाईबाबत मौन पाळत मुक संमती देणे याबाबतही क्रिकेट प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
रायगड जिल्ह्यातील नवोदितांना रणजी व राष्ट्रीय पातळीवर संधी मिळावी यासाठी खोपोली क्रिकेट असोशियन सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करीत गेली तेरा वर्षे अशाप्रकारे सामने आयोजित करून नवोदितांना प्रोत्साहन देत आहे. निकुंज विठलाणीच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत जसे….. निकुंज वर कारवाई कुठल्या नियमानुसार करण्यात आली? सदर कारवाईबाबत फोन करणारी ती व्यक्ती असोसिएशनची संबंधित आहे का? या कारवाईबाबत असोशियनने ठराव केला आहे का? जिल्हा क्रिकेट असोसिएशनने कारवाईबाबत लेखी पत्र दिले आहे का? असे अनेक अनुत्तरीत प्रश्नांची मालिकाच निर्माण झाली आहे. सदर कारवाई पूर्व वैमनस्यातून तर झाली नाही ना असाही सवाल अनेकांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने गेल्या पाच वर्षात निवड चाचणी घेतलेलीच नाही, ती फक्त नेट मध्ये घेतली जाते व तेही प्रत्येक खेळाडू कडून दोनशे रुपये घेऊन. तर खोपोली क्रिकेट असोसिएशन दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करून नवोदित खेळाडूंना संधी देत असते. मात्र जिल्हा असोसिएशन काहीच करीत नाही आणि दुसरा करेल त्यालाही करून देत नाही. भविष्यात आपण स्वतः रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कारभारात लक्ष घालणार असून, जिल्ह्यात लेदर बॉल क्रिकेटला आलेली मरगळ खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दूर करणार असल्याचे अध्यक्ष यशवंत साबळे व सचिव अविनाश तावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खोपोली येथे सांगितले.