लोणावळा : 2014 सालापासून भारतीय महिलांच्या आयुष्यात परिवर्तन यायला सुरुवात झाली. महिला वर्गाला मध्यवर्ती ठेऊन त्यांच्यासाठी अनेक योजना आणून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केले गेले. याच नारी शक्तीला वंदन करण्यासाठी रन फॉर नेशन, रन फॉर मोदी हे घोषवाक्य देत नारी शक्ती वंदन मॅरेथॉनचे आयोजन देशभरात करण्यात आले असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी लोणावळ्यात केले.
लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन मॅरेथॉन स्पर्धेसाठी चित्रताई वाघ या लोणावळ्यात आल्या होत्या. या मॅरेथॉनची सुरुवात आणि पारितोषिक वितरण चित्रताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस कविता हिंगे, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पूनम चौधरी, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, यांच्या सोबत भाजपचे सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, आजीमाजी पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन गटात घेण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात पूजा केदारी यांनी पहिला तर पांडुरंग बोऱ्हाडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात लोणावळा महाविद्यालयाचा अमोल मरगळे व व्ही.पी. एस.चा रितेश आडकर यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या गटात आदिवासी समाजातून आलेली व संपूर्ण मॅरेथॉन अनवाणी धावलेली सोनू सांबरे हिने पहिला तर सुमित्रा चौहान हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सोनू सांबरे हिचे चित्रताई वाघ यांनी विशेष कौतुक केले. भाजपचे प्रदेश सदस्य आशिष बुटाला यांनी सोनू सांबरे हिच्यासह या मॅरेथॉन स्पर्धेत अनवाणी धावलेल्या आदिवासी समाजातील मुलांना स्वखर्चाने नवीन बूट विकत घेऊन दिले. याशिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलामुलींना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपचे मावळ तालुका विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या वतीनं लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन सायकल भेट देण्यात आल्या. या लकी ड्रॉ मध्ये अबोली बोडके, रितेश आडकर आणि गौरव मोहिते यांना विजेतेपद मिळाले. या स्पर्धेच्या आयोजनात लोणावळा शहर भाजपच्या महिला आघाडीने विशेष परिश्रम घेतले.