लोणावळा : येथील वेहेरगाव परिसरात अवैधरित्या सुरू असलेली दारूची हातभट्टी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केली आहे. सोबतच याठिकाणी गावठी दारू बनवण्यासाठी आवश्यक असणारे चार बॅरल मध्ये ठेवण्यात आलेले 40 हजार 800 रुपये किमतीचे 800 लिटर रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की वेहेरगाव परिसरातील देवकर वस्ती याठिकाणी बेकायदेशीर गावठी दारू तयार करणारी हातभट्टी सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सागर आरगडे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे, पो.ना. किशोर पवार, पो.कॉ. सूरज गायकवाड, रवींद्र ठोंबरे, उत्तम सांडभोर यांनी मंगळवारी सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना हातभट्टी बनवण्याच्या तयारीत असलेली एक महिला मिळून आली. पोलिसांनी तात्काळ ही हातभट्टी उद्धवस्त करीत, याठिकाणी मिळून आलेलं गावठी दारू बनवण्यासाठी लागणार सर्व रसायन नष्ट केले.
लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून याप्रकरणी महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे यांनी फिर्याद दिली असून आरोपी महिलेच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलम 65 (फ)प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीसचे पोलीस हवालदार विजय मुंढे हे करीत आहे.