लोणावळा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षेत तुंगार्ली गावातील युवक प्रसाद शंकरराव इंगुळकर याने यश प्राप्त केले असून त्याची ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी म्हणून स्पर्धा परीक्षेतून निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घरची परीस्थिती हलाखीची असताना केवळ लहानपणापासून असणारी असलेली अभ्यासाची आवड, सातत्य, जिद्द, चिकाटी व अभ्यासाचे योग्य नियोजन यामुळे हे आपल्याला यश प्राप्त झाले असल्याचे प्रसाद याने सांगितले. प्रसादचे वडील हे खंडाळा येथील अंधवृद्धाश्रम येथून सेवानिवृत्त झाले आहे तर आई कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिलाईचे काम करते. यापुर्वी प्रसादचा भाऊ विकास याची देखील स्पर्धा परीक्षेतून भारतीय रेल्वे विभागात निवड झाली आहे.
एकाच घरातील दोन जणांची स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत निवड होण्याचे हे तुंगार्ली गावातील एकमेव उदाहरण आहे. प्रसादने व विकासने आपल्या यशाचे श्रेय त्याचे शिक्षकबंधू कार्ला एकवीरा विद्या मंदिराचे शिक्षक उमेश इंगुळकर व कुटुंबातील सर्व सदस्यांना दिले आहे. शिवाय त्यांनी तुंगार्लीकर ग्रामस्थांचे देखील आभार मानले आहे. प्रसाद याची निवड जाहीर झाल्यावर ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण तुंगार्ली गावातून त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. आपल्या गावातील युवकाची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय पदावर झालेली निवड ही संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद असल्याचं गावकरी सांगत आहे.