लोणावळा : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच खटके उडाले असून आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) हे दोन पक्ष आमनेसामने आले आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये देखील याचे पडसाद उमटताना दिसू लागले आहे. सांगलीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटील यांना उमेदवारी नाही मिळली तर वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांनी घेतली आहे.
माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील हे मागील सात वर्षे सांगली मतदारसंघात काम करीत. सांगली हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ असून विशाल पाटील हे त्याठिकाणी नक्कीच विजय मिळवतील. असाच प्रकार शिर्डी मतदारसंघात देखील असून तेथील पक्षाच्या तरुण कार्यकर्त्या उत्कर्षां रूपवते या शिर्डी जिंकू शकत होत्या. मुंबईमध्ये हेच घडत आहे. तरुण पिढी चे खच्चीकरण करू नका अन्यथा गरज पडल्यास राजीनामा देऊ असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांनी दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने 17 लोकसभा मतदारसंघांमधल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात सांगली मतदारसंघातल्या उमेदवाराचा देखील समावेश असल्याने महाविकास आघाडीतली परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेने काँग्रेससाठी कोल्हापूरची जागा सोडली, तर काँग्रेसने सांगलीची जागा तसेनेसाठी सोडली पाहिजे अशी भूमिका शिवसेना उबाठा पक्षाने घेतली आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगलीचं तिकीट देण्याचा शब्द दिला होता आणि त्यानुसार शिवसेना उबाठा गटाच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. हे काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाला आवडलेलं नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसकडून ही जागा लढवणार असल्याने काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे.
सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा करणं हा शिवसेना उबाठा गटाचा चांगला निर्णय नाही. या जागांसंदर्भातली बोलणी अद्याप सुरू असताना त्यांनी त्या जागांवर उमेदवारांची नावं जाहीर न करता आघाडी धर्म पाळायला हवा होता. आमची सांगलीच्या जागेसाठीची मागणी अद्याप कायम आहे अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे लवकरच या जागेच्या संदर्भात योग्य तोडगा निघाला नाही तर त्याचा फटका निवडणुकीत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.