लोणावळा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाकडून मावळ लोकसभेसाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारणे यांच्या उमेदवारीमुळे आता मावळ लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून त्यांची लढत महाविकास आघाडीमधून शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या संजोग वाघिरे यांच्याशी होणार आहे.
मावळ लोकसभा क्षेत्रातून श्रीरंग बारणे यांनी सलग दोन टर्म विजय मिळवला आहे. मात्र यावेळी त्यांच्या विरोधात तयार झालेली एंटी इनकम्बेंसी तसेच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही मित्रपक्षाकडून या जागेवर करण्यात आलेल्या दाव्यामुळे बारणे यांच्या उमेदवारी संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महायुतीमध्ये येथील जागेची अदलाबदल केली जाईल अशीही मोठी चर्चा होती. मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळणार याविषयी बारणे हे सुरुवाती पासूनच आश्वस्त होते.
मावळ लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा जागेंपैकी चिंचवड, पनवेल आणि उरण या तीन ठिकाणी भाजप आणि भाजप सहयोगी आमदार असून पिंपरी आणि मावळ या दोन ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे आमदार आहे. केवळ कर्जत विधानसभा या एकमेव जागेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहे. सहा पैकी पाच विधानसभा क्षेत्रात मित्र पक्षाचे मोठं प्राबल्य असल्याने बारणे यांची नय्या पार करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम त्यांच्या मित्र पक्षात स्थानिक पातळीवर त्यांच्या संदर्भात असलेली नाराजी दूर करण्याची कसरत करावी लागणार आहे.
एकीकडे बारणे यांना दोन वेळची एंटी इनकम्बेंसी आणि मित्रपक्षात असलेल्या नाराजीचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजोग वाघिरे यांच्यापुढील गणित देखील काँग्रेस सारख्या मित्र पक्षात मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या नाराजीमुळे अवघड होताना दिसत आहे. सांगली आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वामध्ये कमालीची नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभेत समाविष्ट असलेल्या लोणावळा शहरातील माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांनी जागावाटपाबाबत आजच काँग्रेस कडून स्वीकारण्यात येणाऱ्या दुय्यम भूमिकेबाबत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. ही अशी नाराजी महाविकास आघाडीत ठिकठिकाणी उमटू लागल्याने वेळेत यावर निर्णय नाही झाला तर याचा फटका महाविकास आघाडीच्या सर्वच जागांच्या गणितांना बसण्याची शक्यता आहे.