लोणावळा : महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा मावळ लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनातील सर्व किंतु परंतु बाजूला ठेऊन महायुतीमधील मित्रपक्षासोबत एकदिलाने काम करून महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार शहर भाजपच्या बैठकीत करण्यात आला. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
लोणावळा शहर भाजपच्या पक्षकार्यालयात भाजपच्या आजीमाजी शहर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज सोमवारी आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या सूचना पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी ऐकून घेतल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, जेष्ठ नेते राजू दळवी, भगवान तनवाणी आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या 6 एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस असून या दिवशी सर्व पदाधिकऱ्यांनी शहरातील वेगवेगळ्या बूथ कमिटीला सोबत घेऊन नागरिकांच्या घरभेटी घ्या, प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने बूथ कमिटी सदस्यांच्या घरावर पक्षाचा झेंडा लावा आशा प्रकारच्या सूचना मकरंद देशपांडे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या. शहराध्यक्ष अरुण लाड यांनी देखील यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील काही दिवस रोज थोडा वेळ पक्षकार्यासाठी द्यावा असे आवाहन केले.