लोणावळा : वसंत व्याख्यानमाला समिती, लोणावळा यांच्या माध्यमातून पुढील संपूर्ण एक आठवडा लोणावळेकर नागरिकांना सांस्कृतिक आणि बौद्धिक मेजवानी मिळणार आहे. वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून रविवार दि. 21 एप्रिल ते शनिवार दि. 27 एप्रिल या सात दिवसात वेगवेगळे मान्यवर आपले विचार, आपले अनुभव, आपली कला लोणावळेकरांच्या पुढं सादर करणार आहे. ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल याठिकाणी वरील सात दिवस रोज सायंकाळी 6 ते 8.30 या दरम्यान ही व्याख्यानमाला संपन्न होणार आहे.
साने गुरुजींचे शिष्य असलेले स्वर्गीय प्रकाशभाई मोहाडीकर यांनी लोणावळा शहरात सुरू केलेल्या व्याख्यानमालेला 21 वर्ष पूर्ण झाली असून यंदाचे या व्याख्यानमालेचे 22 वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेत आरोग्य, साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा व इतर अनेक विषयांवर विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित, मान्यवर, तज्ज्ञ मंडळींची व्याख्याने होत असतात. वसंत व्याख्यानमाला समिती, लोणावळा या संस्थेकडे लोणावळा शहरातील सांस्कृतिक जीवनामान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेली एक अग्रगण्य संस्था म्हणून बघितलं जाते. आजवर विविध क्षेत्रात केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पटलावर आपली छाप सोडलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींनी हे व्याख्यानमालेचे व्यासपीठ आपल्या उपस्थितीने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. यावर्षी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर पानिपतकार विश्वास पाटील, संस्कृत या विषयात तब्बल सात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या गौरी माहुलकर आणि 1999 सालच्या कारगिल युद्धात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी 17 गोळ्या अंगावर झेलत आपल्या सर्वोच्च पराक्रमाने आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या परमवीर चक्र विजेत्या योगेंद्रसिंह यादव यांच्यासारखे मान्यवर रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
यावर्षी वसंत व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी 21 एप्रिल रोजी परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव हे कारगिल युद्ध आणि मी या विषयावर ते स्वतःचे अनुभव कथन करणार आहेत. प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना निर्माण करणारे, प्रत्यक्ष युद्धभूमीवरील त्यांचे थरारक अनुभव नक्कीच ऎकण्यासारखे असणार आहे. 22 एप्रिल रोजी ‘श्यामची आई आजही हवी आहे’ या विषयावर श्यामची आई या नविन सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडे, शर्व गाडगीळ, सुनील सुकथनकर, सुजय डहाके, सौरभ चांदेकर यांची प्रकट मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाट हे घेणार आहेत. लहान मुलांसाठी हा अतिशय उत्तम संवाद असणार आहे. 23 एप्रिल रोजी पानिपतकार विश्वास पाटील लिखित पानिपत ते महासंग्राम मी आणि माझ्या कादंबऱ्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. 24 एप्रिल रोजी अरुणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा या पुस्तकावर आधारित अभिवाचन नृत्य आणि मुक्त चर्चेतून मांडणी सुप्रसिद्ध नर्तिका अर्चना अनुराधा व स्नेहल दामले या करणार आहेत. 25 एप्रिल रोजी हमीद दाभोळकर हे ‘मनाचे आरोग्य स्वतःचे आणि समाजाचे’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. 26 एप्रिल रोजी संस्कृत या विषयावर प्रचंड प्रभुत्व असणाऱ्या प्रा. गौरी माहुलीकर या कालिदासांच्या सहा नायिका उलगडून सांगणार आहेत. 27 एप्रिल रोजी महानायक अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम स्वरानंद कोल्हापूर व कराड येथील गायकांकडून सादर केला जाणार आहे.
अतिशय उत्तम दर्जाचे वक्ते या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार प्रकट करणार आहेत. तरी लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी या व्याख्यानमालेचा आनंद घ्यावा असे आवाहन वसंत व्याख्यानमाला समितीच्या कार्यकारणी सदस्यांनी केले आहे. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला विश्वस्त अध्यक्ष राधिका भोंडे, कार्यकारणी अध्यक्ष चित्रा जोशी, उपाध्यक्ष स्वरूपा देशपांडे, सचिव नितीन तिकोणे, खजिनदार चारुलता कमलवार, प्रशांत पुराणिक, ॲड. संजय गायकवाड आणि सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.