लोणावळा – जय श्रीराम, प्रभू जय श्रीराम असा जय घोष करत लोणावळा शहरातील गवळीवाडा आणि भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात श्री रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोणावळ्यातील गवळीवाडा येथील श्रीराम मंदिरात साजऱ्या करण्यात येणाऱ्या श्री राम नवमी जन्मोत्सवाचे हे 90 वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने याठिकाणी अभिषेक, पूजा, होमहवन, भजन, बैलगाडी स्पर्धा, कुस्त्यांचा आखाडा, मनोरंजनाचे कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट व श्रीरामनवमी उत्सव कमिटी, गवळीवाडा लोणावळा यांच्या वतिने करण्यात आले होते. रामनवमीच्या दिवशी दुपारी साडे बारा वाजता प्रभू श्रीराम जन्म सोहळा श्रीराम महिला मंडळाच्या वतिने देवाचा पाळणा म्हणत साजरा करण्यात आला. संध्याकाळी देवीच्या छबिण्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यावेळी गवळीवाडा व लोणावळ्यातील हजोरो श्री रामभक्तांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट, श्रीराम क्रिडा मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, श्रीराम ढोल लेझीम मंडळ, श्रीराम अॕटो रिक्षा स्टँड, श्रीराम महिला मंडळ व गवळीवाडा ग्रामस्थांकडून करण्यात आले होते.
भांगरवाडी येथील राम मंदिराच्या जिर्णोध्दाराचं काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 26 एप्रिल रोजी मंदिराचा कलशारोहन संपन्न होणार आहे. त्यापूर्वी राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने गुरुवारी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता गीतरामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या धाटणीप्रमाणे बांधकाम करण्यात आलेले हे मंदिर अतिशय टुमदार असे झाले असून नागरिकांचे आकर्षणस्थळ बनले आहे. रामनवमीचे औचित्य साधून नागरिक मोठ्या संख्येने हे मंदिर बघण्यासाठी येत आहे.