लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा विविध समाजाची कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील चैत्री यात्रेचा आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी पाच वाजता कार्ला, वेहरगाव गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘आई माउलीचा उदो उदो’ ‘आई मी आयलो’ च्या नामघोषांनी तसेच गीतांच्या तालावर नृत्य करत अवघा कार्ला गड यावेळी दुमदुमून गेला होता. कड़क पोलिस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव व ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत ‘आई राजा उदो उदो’ चा गजर केला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती.
मुंबई व कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस आणि कित्येक तासांचा पायी प्रवास करत भाविक कार्ल्यात दाखल झाले होते. पालखी मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन व नवनियुक्त विश्वस्त मंडळ यांनी नियोजन केले होते. यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कुंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, याकरिता तालुका प्रशासन व पोलिस विभाग यांच्याकडून सातत्याने विविध विभागाच्या बैठका घेत नियोजन करण्यात आले होते.
यात्रा काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य व सुलभ प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मावळ तहसिलदार विक्रम देशमुख, लोणावळाचे पोलिस उपविभागीय अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, वेहेरगावच्या सरपंच व विश्वस्त वर्षा मावकर, विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, सागर देवकर, विकास पडवळ, संजय गोविलकर, महेंद देशमुख, मंडळ अधिकारी आशा धायगुडे, मानिक साबळे, तलाठी दिपक धनवडे, वन विभाग अधिकारी प्रमोद रासकर, पोलिस पाटील अनिल पडवळ, संजय जाधव, आगरी समाज नेते जयेंद्र खुणे तसेच विविध शासकीय अधिकाच्यांना बरोबर घेऊन यावेचे नियोजन करण्यात आले होते.
कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
यात्राकाळात कार्ला परिसरातील गावात तीन दिवस पूर्णपणे दारुबंदी तसेच यात्राकाळात ध्वनिप्रदूषणावर अंकुश ठेवण्यासाठी गडावर फटाके वाजविण्यास बंदी केली होती. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह चार पोलिस निरीक्षक, ३० सहायक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ३५० पोलिस कर्मचारी, होमगार्ड, पोलिस दल तुकड्या, स्ट्रायकिंग पथक, विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी असा बंदोबस्त या यात्रेसाठी तैनात करण्यात आला होता.