लोणावळा : तेलंगणा राज्यातून कुर्ला, मुंबई याठिकाणी बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना ट्रकसह लोणावळा पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांसह अन्य दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा 1976 चे कलम 9 (अ) (ब), 5 (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास ओमकार सुधिर शिर्के (रा. गवळीवाडा, लोणावळा) व त्याच्या सोबत असणाऱ्या तीन जणांकडून पोलिसांना एका संशयित ट्रक बाबत बातमी मिळाली. त्या बातमीच्या अनुषंगाने लोणावळा पोलिसांनी ट्रक (क्र. टी. जी. 08 टी. 0259) थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात गोमांस भरलेले पाकिटं मिळून आली. ट्रकचा चालक महंमद इकबाल महंमद इब्राहिम कादरी (वय 51 वर्षे रा.रहिमत कॉलनी, पुर्व बंदलगुडा, हैद्राबाद, तेलंगना) हा बरकत टॅम्पो सर्विस (लकडराम रोड, इसनापुर, जि. संगारेड्डी, तेलंगना) येथील दस्तगीर (पुर्ण नाव माहित नाही) याच्या सांगण्यावरून हैद्राबाद मधील राजीव गांधी एअरपोर्टच्या शेजारी असलेल्या पहाडी शरीफ येथील एका गोडावुन मधुन गोमांस पॅकेट ट्रकमधून घेऊन बेकायदेशीररित्या शफीक महम्मद कुरेशी (रा. कुर्ला ईस्ट, कुरेशीनगर, मुंबई) यांना देण्यासाठी चालला होता.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ज्ञानदेव फाळके यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गोमांस भरलेल्या टेम्पोसह महंमद इकबाल महंमद इब्राहिम कादरी व शफीक महम्मद कुरेशी यांना ताब्यात घेतलेले आहे. याशिवाय बरकत टॅम्पो सर्विसचा दस्तगीर (पुर्ण नाव माहित नाही) आणि गोडावुन चालक यांचे विरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढिल तपास लोणावळा पोलीस स्टेशनचे पो.स.ई. पाटील हे करीत आहे.